Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात काही मंडळींकडून सहकार संपवण्याचा प्रयत्न : खासदार सुजय विखे पाटील

    206

    श्रीरामपूर: जिल्ह्यात सध्या काही मंडळी सहकार (Cooperation) संपविण्यासाठीच काम करत आहे, असे दिसते. मात्र, यातून सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकरी संपवला जातोय, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) म्हणाले. श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को-ऑप सोसायटी (Co-op Society) लिमिटेडच्या ५० व्या वार्षिक सर्व साधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक रावसाहेब खेडकर होते.

    खासदार विखे पाटील म्हणाले, सध्या कुठलीही सहकारी संस्था जीचा विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध आला अशा संस्था बंद कशा पडतील, यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु ते हे विसरत आहे की आमच्या कुटुंबियांनी त्या जिवंत ठेवल्या, त्यामुळे संस्थेशी निगडित कामगार, मजदूर, शेतकरी आणि त्यावर आधारित त्यांचा संसार चालला. मात्र, या लोकांनी आम्हाला विरोध करण्यासाठी या सर्वांच्या संसारावर पाणी फेरले. केवळ विरोधासाठी राजकारण करून सहकारी संस्था बंद पाडण्याचा जो उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत, त्यामुळे शेतकरी, कामगार, मजदूर आणि त्यांचे कुटुंबीय हे उघड्यावर येत आहेत. ते जे हे पाप करत आहेत त्याची परतफेड ही त्यांना करावीच लागणार असून हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

    मुळा प्रवरा इलेक्ट्रिक को- ऑप सोसायटीचे काम अत्यंत चांगले चालविण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, त्यावरही प्रशासक आणले. यामुळे माझे काय नुकसान झाले नाही, परंतु ह्या सोसायटीवर आधारित कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायालयात सोसायटीचे मतदान कमी करण्यासाठी अनेकजण पुढे आले. मात्र, ही सोसायटी व्यवस्थित चालवून शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील आहेत. सभेच्या प्रारंभी कार्यकारी संचालक व्ही. टी .पाटील यांनी प्रास्ताविक करून सभेचे ठराव मांडले. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण सभेस माजी संचालक, सभासद यांची उपस्थिती होती.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here