
शेवगाव: शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकारने (government) आगामी अधिवेशनात मांडावेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन संबंधित निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशा विविध प्रश्नांसाठी बाळासाहेब सदाशिव शिंदे गेल्या चार दिवसापासून उपोषणास बसलेले होते. अखेर तहसीलदारांच्या (Tehsildar) आश्वासनानंतर शिंदे यांनी चौथ्या दिवशी उपोषण (strike) मागे घेतले.
जोपर्यंत माझे प्रश्न केंद्र शासनापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा शिंदे यांनी घेतल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती. तिसऱ्या दिवशी शिंदे यांची प्रकृती खालावल्याने नायब तहसीलदार गुरव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना उपोषण सोडवण्याची विनंती केली. त्याचबरोबर आरोग्य विभागास माहिती देऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. त्यांनी शिंदे यांना उपोषण मागे घेण्यास विनवणी केली. मात्र, शिंदे यांचे प्रश्न ‘जैसे थे’ असल्याने त्यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
आज (ता.२१) तहसीलदार सागडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच शिंदे यांचे प्रश्न केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू व त्या प्रश्नांचा पाठपुरावा करू, असे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याने शिंदे यांनी उपोषणास परावृत्त होण्याचा निर्णय घेऊन उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांची तहसीलदारांनी स्वतः पाहणी केली व संबंधित रस्ते तत्काळ दुरुस्त करण्याचेही आश्वासन दिले.