Strike : आशा व गटप्रवर्तक धडकल्या जिल्हा परिषदेवर; आजपासून बेमुदत संपावर

    166

    नगर : दबाव तंत्राने बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाइनचे काम (Online work) बंद होण्यासाठी जिल्ह्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषदेवर (Zilla Parishad) मोर्चाने येऊन बेमुदत संपाची (strike) हाक दिली. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील ३२०० आशा सेविका व १९० गटप्रवर्तक तर राज्यातून ७४ हजार आशासेविका (Ashasevika) संपावर गेल्या आहे. जोपर्यंत ऑनलाईनचे काम काढून घेतले जात नाही, तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा आक्रमक पवित्र घेण्यात आला आहे.

    बुरुडगाव येथील भाकपच्या कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात झाली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हा परिषदेत धडकला. या आंदोलनात आयटकचे राष्ट्रीय सदस्य ॲड. सुधीर टोकेकर, संघटनेच्या अध्यक्षा सुवर्णा थोरात, मार्गदर्शक कारभारी उगले, जिल्हा संघटक सुरेश पानसरे, निवृत्ती दातीर, उषा अडांगले, आशा देशमुख, वर्षा चव्हाण, जयश्री गुरव आदी उपस्थित हाेते.

    आशा वर्कर यांना आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड बाबतचे काम बळजबरीने करुन घेतले जात आहे. या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन सुरु आहे. हा संप १६ ऑक्टोंबर रोजी होणार होता, परंतु, संघटनेतील कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा न निघाल्याने हा राज्यव्यापी संप १८ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आला असल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. आशा वर्कर या कमी शिकलेल्या असून, त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड संबंधित इंग्रजीमध्ये ऑनलाईन माहिती भरणे अत्यंत किचकट व अवघड आहे. अनेक आशांकडे स्मार्ट फोन देखील नसल्याने या कामासाठी त्यांना अडचणी येत आहे. या कामाचा योग्य मोबदला देखील त्यांना दिला जात नाही. आशा वर्कर यांना हे काम करण्यासाठी दडपण आणले जाते व बळजबरीने काम करून घेतले जात आहे, असा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

    आशा वर्कर यांना ऑनलाईनची कामे देऊ नये, गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी भत्ते लागू करावे, जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे वेतनश्रेणी द्यावी आदी मागण्याक करण्यात आल्या आहे. मोर्चाचे निवेदन राष्ट्रीय ग्रामीणचे नियंत्रक अमोल शिंदे व जिल्हा समन्वयक संज्योत उपाध्ये यांना देण्यात आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here