ST Strike : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी संघटनांच्या कृती समितीशी बैठक झाली. 21 संघटनांची मिळून ही कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली आहे. सकारात्मक चर्चा झाल्याचे विविध संघटनांच्या सदस्यांनी बैठकीनंतर सांगितले आहे. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेसाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन कृती समितीच्या सदस्यांनी केले आहे. बैठकीनंतर सदस्य नेमके काय म्हणाले ते पाहुयात…
श्रीरंग बर्गे (सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस) कृती समितीतील सदस्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी सकारात्मक चर्चा केली. आमच्या शंकेचे निरसन त्यांनी केले. जी वेतनवाढ केली होती. त्यमध्ये त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच विलीणीकरणाबाबत समिती जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अनिल परब यांनी सांगितल्याचे बर्गे म्हणाले. या चर्चेवर आमची संघटना समाधानी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन बर्गे यांनी केले.
आम्ही सुरु केलेला संप मागे घेतला होता. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान ज्या अडचणी आहेत, त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होणार नाही. वेतन कपातीपोटी जे कर्मचारी हजर झाले नाहीत, त्यांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. वेतन कपात होणार नसल्याचेही आश्वासन आजच्या बैठकीत दिले आहे. तसेच जी वेतनवाढ झाली होती याबाबतही चर्चा झाली. त्यातील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्यासाठी चर्चा करु असे सांगण्यात आले आहे. तसेच न्यायालयीन लढाईसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती, पण त्यांच्या जागी आता दुसऱ्या वकिलाची नेमणूक केली आहे. अॅड. सतिश पेंडसे यापुढील तारखेला आमच्या वतीने हजर राहणार आहेत. न्यायालयात विलीणीकरणाचा लढा सुरूच राहणार आहे, त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आता संप करण्याची गरज नाही. त्यामुळे कर्चाऱ्यांनी हजर राहावे असे आवाहन अजयकुमार गुजर यांनी केले.
एसटी जगलो तर आपण जगणार आहोत, प्रवाशांशी आपली बांधिलकी आहे, त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या सर्व सभासदांनी संप मागे घ्यावा असे आवाहन यावेळी मालोकार यांनी केले. एसटी पूर्ववत सुरू करावी. आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, याची ग्वाही आम्हाला मिळाली आहे. आपल्याला जर कोणता त्रास होत असेल तर आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन देखील यावेळी विजय मालोकार यांनी सांगितले.
अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्रस्तळेपणामुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन कर्मचाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे, हे माहिती नाही. ते सांगतात की, एसटी कर्मचारी नैराश्यात गेले आहेत. पण आम्हाला गुणरत्न सदावर्ते हेच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटतात, अशी टीका कास्ट ट्राईब परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निर्भवणे यांनी केली आहे. लोकांच्या डोक्यात सदावर्ते यांनी भ्रम निर्माण केला आहे. लोकांना चुकीच्या पद्धतीने भडकवण्याचे काम ते करत असल्याचे यावेळी निर्भवणे यावेळी म्हणाले. ज्यांची नोकरी गेली त्यांची नोकरी सुद्धा टीकणार आहे. त्यावर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.
आजच्या बैठकीत प्रदिर्घ चर्चा झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे अशी मागणी केली. तसेच त्याची हमी राज्य सरकारने घ्यावी अशीही मागणी यावेळी केली असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले. संपाची नोटीस नसताना कोणतीही कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. या स्थितीत एसटी कर्मचारी आणि कामगारांचे दोघांचेही नुसकान आहे. कर्मचारी म्हणतायेत संघटनांशी आमचे देणेघेणे नाही. आम्ही संघटना विरहीत आहोत, त्यामुळे संघटनांची ताकद कमी होत असल्याचे तिगोटे म्हणाले. चर्चा करुन मार्ग काढायचा असेल तर एसटी सुरू करणे गरजेचे आहे. अॅड गुणरत्न सदावर्ते हे कामगारांना संमोहीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कामगारांचे मोठे नुकसान होत असल्याचे तिगोटे म्हणाले. त्यामुळे कामगारांनी कामावर यावे असे आवाहन त्यांनी केले.
सातवा वेतन आयोगासह, कर्मचाऱ्यावरील झालेल्या कारवायांच्या बाबतीत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र मोटार फेडरेशनच्या वतीने सर्व कामागांना विनंती करतो की त्यांनी संप मागे घ्यावा. प्रवाशांच्या आणि आपल्या स्वत: च्या हितासाठी संप मागे घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
कामगारांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही आजच्या बैठकीत आम्हाला देण्यात आली आहे. त्यामुळे कामगांनी प्रवाशांची सेवा करण्यासाठी त्यांनी कामावर हजर व्हावे असे यावेळी दादाराव डोंगरे यांनी सांगितले.
पोटाला जात धर्म काही नसतो. गेल्या 2 महिन्यापासून एसटी कर्मचारी संप करत आहेत. या संपामागे मोठे षडयंत्र असल्याचे यावेळी हरी माळी यांनी सांगितले. त्यामुळे कामगारांनी आता शहाणे व्हायला पाहिजे. कारण आज ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे, ते पूर्ण नाही केले तर कामगारांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उभी असल्याचे माळी म्हणाले. आपल्या कुटुंबासाठी , महाराष्ट्रासाठी कोरोनाच्या संकटात कामावर जा असे ते म्हणाले.