SSC-HSC Results : औरंगाबाद विभागामुळे दहावी-बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागणार?

402

औरंगाबाद : औरंगाबाद विभागीय मंडळामुळे दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल उशिरा लागणार असल्याचं औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्रावरुन दिसत आहे. औरंगाबाद बोर्डाच्या अध्यक्षांनी आता सर्वच प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना कारवाई करणार असल्याचं पत्र पाठवलं आहे. प्राचार्य, मुख्याध्यापकांनी हे काम शिक्षकांडून मुदतीत करुन घेतल नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा बोर्डाने दिला आहे.

5 एप्रिल रोजी राज्य महामंडळाच्या अध्यक्षांकडून ऑनलाईन मीटिंमध्ये दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेण्यात आला. या आढाव्यात औरंगाबाद विभाग वगळता उर्वरित सर्वच मंडळांचे उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज वेळापत्रकानुसार 90 टक्के झाल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद मंडळाच्या दृष्टीने ही बाब खेदाची असल्याचं अध्यक्षांचं म्हणणं आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 जूनपूर्वी दहावीचा आणि 15 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. मात्र औरंगाबाद विभागी मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक संबंधित शाळांचे उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला विलंब करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ही बाब विचारात घेऊन संबंधित शाळेचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल, असाही इशारा बोर्डाने दिला आहे. संबंधित शाळांच्या प्राचर्य, मुख्याध्यापकांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष देऊन राज्य मंडळाला दहावी आणि बारावीचा निकाल वेळेत घोषित करता येईल, असा विद्यार्थी हिताच्या दृष्टीने जाणीवपूर्व प्रयत्न करावा, असं आवाहन औरंगाबाद विभागीय मंडळाचे प्र. विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here