Sonia Gandhi Health Updates: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
कोविड-19 आजाराची लागण झाल्यानंतर त्यांना 12 जून रोजी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना श्वसनमार्गात संसर्ग झाल्याचे आढळून आले. काँग्रेसचे संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी सोनिया गांधींच्या प्रकृतीबाबत सांगितले होते की, 12 जून रोजी त्यांच्या नाकातून रक्त येत होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ईडी चौकशीला 23 जून रोजी राहणार हजर?नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोनिया गांधी यांना नवीन समन्स जारी केले आहेत. सोनिया गांधी यांना यापूर्वी 8 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख मागितली होती. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याने त्या 23 जून रोजी ईडीच्या चौकशीला हजर राहणार का? हे पाहावं लागेल. दरम्यान, ईडी आधीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत असून ते आजही ईडीसमोर हजर झाले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे.