Shivsena : ही तर ‘चोरसेना’, नगरसेवक चोरता-चोरता शिवसेना आता फोटोही चोरायला लागली; मनसेचा हल्लाबोल

491

मुंबई: शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसेच्या सभेची दृश्य वापरल्याचा दावा मनसेने केला आहे. संबंधित व्हिडीओ आणि फोटो ट्वीट करत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी हा दावा केला आहे. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना फोटोही चोरु लागली असा टोला गजानन काळे यांनी शिवसेनेला लगावला आहे.

मनसेच्या सभेला उत्तर देण्यासाठी येत्या 14 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. शिवसेनेने या सभेचे टीझरही पब्लिश केलं होतं. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये शिवाजी पार्कवरच्या राज ठाकरेंच्या सभेचे फोटो शिवसेनेच्या व्हिडीओत वापरण्यात आल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता फोटोही चोरु लागली असा टोला त्यांनी लगावला आहे. शिवसेनेचा आत्मविश्वास गेलाय का? शिवसेनेला नैराश्य आलय का? असा सवाल गजानन काळे यांनी केला. शिवसेनेने नाव बदलून ‘चोरसेना’ नावं ठेवावं असा हल्लाबोल त्यांनी केला

दरम्यान, मनसेने केलेल्या या दाव्यानंतर शिवसेनेवर तो व्हिडीओ काढून टाकण्याची नामुष्की आली आहे. शिवसेनेच्या सभेचा तो टीझर आता मागे घेण्यात आला आहे.

शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 14 मे रोजी बीकेसीमधे होणाऱ्या जाहीर सभेचा टीझर ट्वीट करण्यात आला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला होता. “मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.” हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. तसेच, “साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे.”, असं आवाहनंही या टीझरमधून करण्यात आलं होतं.

येत्या 14 तारखेला शिवसेनेची सभा असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. मनात काही गोष्टी आहेत, त्या बोलणार आहे. 14 तारखेला अनेकांचे मास्क काढणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here