School reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय? पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय?

433

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) प्रभाव आणि रुग्णसंख्येत झालेली घट, तर विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मोठ्या मागणीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय (School reopen) राज्य सरकारनं घेतलाय. मुंबईतील शाळा या 27 जानेवारीपासून सुरू (School Starting Date) होणार आहेत, तर राज्यातल्या शाळा या 24 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. शाळांबाबत आधीचेच नियम गृहीत धरले जाणार, असल्याची माहितीही काकाणी यानी दिली आहे. मात्र, शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं विचार न करता घेतल्याचा दावा IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केलाय.

1ली ते 9वी च्या मुलांचं लसीकरण अजूनही झालेलं नाही. शाळेत मुलं नियम पाळत नाहीत किंवा त्यांना ते पाळणं शक्य होत नाही. त्यामुळे इतर विचार असलेल्या मुलांना कोरोनाचा त्रास होऊ शकतो. त्यांच्यापासून जर घरातील सदस्यांना कोरोना झाला तर वयोवृद्ध व्यक्तींना त्रास झाला तर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मुलांचं लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्य नसल्याचं मत डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केलंय.

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. असेही त्या म्हणाल्या.

मुंबईतील शाळा 27 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील शाळांबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. पालक, डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जातील. आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. या सगळ्याचा विचार करुनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मोहोळ म्हणाले.

औरंगाबादेतील शाळा सध्या तरी सुरु होणार नाहीत. महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी याबाबत तोंडी माहिती दिली आहे. औरंगाबादेत पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्के असल्यानं वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेण्यात आलीय. सोमवारनंतर आठ दिवस परिस्थितीचं निरीक्षण केलं जाईल. त्यानंतर परिस्थिती योग्य असेल तरच शाळा सुरु करणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here