Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात नागपुरात लेखी तक्रार, अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

391

Sanjay Raut : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नागपुरात खासदार नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी देणे आणि अ‍ॅट्रॉसिटी (Atrocity ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

युवा स्वाभिमानच्या कार्यकत्यांनी नवनीत राणा यांच्या स्वाक्षरीसह लेखी तक्रार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे दिली आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबद्दल 20 फूट गड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा नागपुरातील एका पत्रकार परिषदेत वापरली होती, असा आरोप युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

संजय राऊत यांच्या नागपुरातील पत्रकार परिषदेतील वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसह लेखी तक्रार नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे

काय म्हणाले होते संजय राऊत? शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा करु नका, ‘मातोश्री’च्या वाटेला जाऊ नका नाहीतर 20 फुट खाली गाडले जाल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिला होता. राणा दाम्पत्याने मातोश्री समोरील हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. “काही घंटाधारी, बोगस हिंदुत्ववादी मुंबईसह महाराष्ट्राचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. मुंबईत येऊन मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याची भाषा वापरण्यात आली. जणू काय आपण महान योद्धे आहोत अशा प्रकारचा आव आणण्यात आला. अमरावतीचे बंटी आणि बबलीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसैनिकांनी काही अॅम्बुलन्स तयार ठेवल्या होत्या. पण पंतप्रधानांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये असं सांगत पळ काढला.” असे संजय राऊत म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here