Samruddhi Expressway : मृत्यूचा सापळा ‘समृद्धी’ मार्ग?; अपघाताची मालिका सुरूच

    157

    नगर : समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) उदघाटनानंतर सुरु असलेल्या अपघातांची मालिका अनेक दिवस झाले तरीही सुरूच आहे. या महामार्गावरील अपघातांमध्ये (accident) आत्तापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे. असाच अपघात दिवाळीच्या दिवशीही घडला आहे. दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला जात असताना ‘समृद्धी महामार्ग १८३’ वर कारचं समोरील टायर फुटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू (death) झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

    पुण्याहून वर्ध्याला कारने जात असताना समृध्दी महामार्गावर कारंजालगत कारचा समोरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कौस्तुभ मुडे (वय वर्ष ३०, रा. वर्धा), अंकित गडकरी (रा. नागपूर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर संदेश गावंडे (वय २६, रा. वर्धा ), कार्तिक निपुडे (वय २८, रा. नागपूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात चारपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा अमरावती येथे उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अमरावतीच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

    समृद्धी महामार्गावरील अपघातांवर अनेक वेळा उपाययोजना सुचविलेल्या आहेत अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले जात आहेत. यामध्ये वाहनांचे टायर व इतर तपासणी करूनच त्यांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार आहे. असे असतांनाही सरळ रस्त्यांमुळे व कुठलेही अडथळे नसल्याने भरधाव वेगात वाहने चालविली जातात. या वेगामुळेच वाहनांवरील ताबा सुटल्याने किंवा टायर फुटल्याने अपघात घडल्याच्या घटना नियमित घडतच आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वाहन चालवितांना आपल्या टायरमध्ये योग्य हवेचा दाब ठेवावा व ठराविक अंतर कापल्यानंतर थोड्याश्या विश्रांतीसाठी थांबणे गरजेचे आहे. सलग वाहन चालवून चालकाला डुलकी लागल्याने स्वतःसोबतच इतरांचाही जीव धोक्यात येतो. तसेच चालकाने मद्यपान करून वाहन चालविल्यानेही अनेक वेळा अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर गोष्टींकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here