
नगर : मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आज (ता. १६) छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. तब्बल सात वर्षांनंतर मराठवाड्यात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह सगळेच मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत मराठवाड्यासाठी ५९ हजार हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या १४ हजार कोटींचाही यात समावेश आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आणि ठोस निर्णय घेण्यासाठी आमची बैठक पार पडली. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा बैठक झाली होती. राज्यातच नाही तर देशात एक मोठी झेप मराठवाड्याने घेतली आहे. अनेकांनी घोषणा केल्या, आम्ही काम करतो आहोत. आत्तापर्यंत आमच्या मंत्रिमंडळाने सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत शेतजमिनीला पाणी पाहिजे ही भावना ठेवून ३५ सिंचन प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती शिंदेनी दिली.
आम्ही घोषणा करून कागदावरठेवलेल्या नाहीत त्याची अंमलबजावणी देखील करत आहोत. आम्ही जे निर्णय घेतले ते मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील लोकांना न्याय देण्यासाठी आहे. जे प्रकल्प प्रलंबित आहेत ते आम्ही मार्गी लावत आहोत. समृद्धी महामार्ग मराठवाड्याला लागून जातो. त्याचा फायदा होईल. औद्योगिक इंडस्ट्री वाढते आहे. त्याचाही फायदा मराठवाड्याला होणार आहे, असं मुख्यमंत्री शिंदे या बैठकीत म्हणालेत.तसेच जेव्हा इंडिया आघाडीचे लोक इथे आले होते तेव्हा ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. पुढच्या वेळी त्यांना थोडा अभ्यास करायला सांगा, असाही टोला एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.