
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमधील २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते.
आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला बुधवारनंतर (ता. १) सुरवात होणार असून प्रवेशावेळी आधार कार्ड बंधनकारक नसणार आहे. तरीपण, संबंधित पालकांनी आपल्या मुलांचे आधार कार्ड काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे केली जाणार आहे. पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होईल. शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.
ऑनलाइन भरलेली माहिती चुकीची असणार नाही, याची पालकांनी खबरदारी घ्यावी, अन्यथा प्रवेश रद्द होऊ शकतो. प्रवेशावेळी नव्हे पण प्रवेशानंतर काही दिवसांनी संबंधित मुलाला आधार कार्ड त्या शाळेत जमा करावेच लागणार आहे. आधार कार्ड न दिल्यास काही दिवसांनी प्रवेश रद्द होऊ शकतो आणि प्रतीक्षेतील मुलास तेथे संधी दिली जाईल.
त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड वेळेतच काढून ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, ‘एनआयसी’कडून प्रवेशासंबंधीचा डेमो झाल्यानंतर प्रवेशाला सुरवात होणार असून प्रवेश प्रक्रिया लांबली असली तरीदेखील प्रवेशासाठी तेवढा वाढीव वेळ दिला जाणार आहे.
‘संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज भरा
सुरवातीला शासकीय वेबसाइटवर जाऊन अर्ज करा
सर्वप्रथम विद्यार्थ्याची नोंदणी करा, पुन्हा जुना पासवर्ड बदलून नवीन पासवर्डने लॉगिन करा
विद्यार्थ्याची मूळ माहिती भरून अर्जातील सर्व माहिती भरा
अर्जातील माहिती भरून झाल्यावर शाळेची निवड करा
शेवटी अर्जातील संपूर्ण माहिती अचूक असल्याची खात्री करून अर्ज सबमिट करा
प्रवेशावेळी लागणारी कागदपत्रे
रहिवासी पुरावा (रेशनकार्ड, आधार कार्ड, वीजबिल, राष्ट्रीयीकृत बॅंक पासबुक)
वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न)
जन्माचा दाखला
मोफत आरटीई प्रवेश प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पडते. कोणात्याही व्यक्तीच्या अमिषाला पालकांनी बळी पडू नये. ऑनलाइन पद्धतीने पार पडणारी ही प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील प्रसिद्ध केली जाते. कागदपत्रांची छाननी करूनच प्रवेश दिला जातो. अर्ज भरतानाच पत्ता अचूक असावा.




