RRB NTPC Protest: रेल्वे परीक्षा निकालाविरोधात बिहार बंदची हाक; पंतप्रधान कार्यालयात संध्याकाळी महत्त्वाची बैठक

567

नवी दिल्ली: RRB-NTPC परीक्षेच्या निकालावर परीक्षार्थीं नाराज असून त्यांनी आज बिहारमध्ये बंद पुकारला आहे. या परीक्षेमध्ये निकाल आणि भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत परीक्षार्थीं आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं चित्र आहे. आता या घटनेची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली असून रेल्वे भरती प्रक्रियेसंबंधी आज संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 

आज संध्याकाळी सहा वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सन 2004 नंतर आतापर्यंत रेल्वे बोर्डामध्ये किती भरती झाली आहे, त्या वेळी भरती प्रक्रिया कशी होती या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने RRB-NTPC आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या श्रेणी-1 ची भरती परीक्षेला स्थगिती दिली आहे.  परीक्षार्थींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक उच्चस्तरीय  समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. परीक्षार्थींनी या परीक्षेच्या निकालावर नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरू केलं आहे.

काय आहे प्रकरण?RRB-NTPC विभागाचा निकाल जाहीर झाल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेशसह इतर ठिकाणी याविरोधात मोठे आंदोलन सुरू झाले आहे.  विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलनही सुरू केलं आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या निकालात घोळ झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. 

आज बिहार बंदची हाकदरम्यान, रेल्वे बोर्डाच्या परीक्षा निकालाविरोधात आज बिहारमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. RRB-NTPC च्या परीक्षेचा निकाल 14-15 जानेवारी रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. एक कोटी 40 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here