
RPI : कर्जत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत अनधिकृत आणि विना परवानगीने फलक लावण्यासाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी फ्रेम तात्काळ काढावी. तसेच ती लावलेल्या व्यक्तीवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा (Atrocity crime) दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आरपीआयच्या (RPI) वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरच्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आहे. या संस्थेच्या वसतिगृह प्रवेशद्वारालगत बॅनर लावण्यासाठी गुरुवारी (ता.२८) मध्यरात्री अचानक मोठ्या लोखंडी आकाराची फ्रेम तयार करीत ती मुख्य गेटच्या समोर जमिनीत पुरत उभारण्यात आली. याकामी कर्जत नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. विना परवानगी आणि अनधिकृत लोखंडी फ्रेम आणि त्यावर लावण्यात येणारे फलक विद्यार्थिनींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणारा आहे.
त्यामुळे प्रशासनाने सदरची लोखंडी फ्रेम आणि त्यावर लावलेला फलक तात्काळ काढावा. तसेच ते उभारण्यात असणाऱ्या सर्व व्यक्तींवर अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. वरील आशयाचे निवेदन संस्थेचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय वाघमारे आणि डी बी गवळी यांनी पोलीस प्रशासनास दिले.
या आंदोलनात आरपीआयचे विशाल काकडे, दत्ता कदम, नगरसेवक भास्कर भैलुमे, संतोष आखाडे अनिल समुद्र, रोहन कदम, सोहम कदम, करण मोहोळ, किरण भैलुमे, अक्षय भैलुमे, सोमनाथ भैलुमे, गोदड समुद्र, अमजद शेख, वसीम शेख, सनी येळेकर, गोविंद गोरे, अमोल क्षीरसागर आदी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे नगर-कर्जत-बारामती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन सतर्क होते.