
नगर : महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक (Stone Throwing) झाल्याची घटना समोर आली आहे. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Jalna District Central Bank) निवडणुका सुरू आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजेश टोपे जिल्हा मध्यवर्ती बँकेत दाखल झाले होते. यावेळी बँकेच्या आवारात टोपे यांची कार उभी असताना ही दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
यावेळी राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या प्रकरणी आज बिनविरोध निवडणुकीची सुद्धा प्रक्रिया पार पडली. पण काही लोकांनी मुद्दाम गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीची काच फुटली आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केलं असेल त्यांना खरंच शिक्षा व्हायला पाहिजे”, असं मत राजेश टोपे यांनी मांडलं आहे.