Radhakrishna Vikhe Patil : महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार : राधाकृष्ण विखे पाटील

    118

    संगमनेर: आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या (Information Technology) बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र चालविण्याचे धोरण आणण्यात येईल, असे मत राज्याचे महसूलमंत्री (Minister of Revenue) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केले.

    संगमनेर महाविद्यालयात महसूल विभागाच्यावतीने ‘युवा ही दुवा ‘ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, संगमनेर उप विभागीय शैलेश हिंगे, उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.अरूण गायकवाड, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे आदी यावेळी उपस्थित होते.

    महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कमवा व शिकाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय व्हावी. यासाठी महाविद्यालय, दिव्यांग, एकल महिलांना सेतू केंद्र देण्याचे शासनाने धोरण आहे. या वर्षी महसूल दिनी महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. यात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ ह्या स्तुत्य उपक्रमात हजारो प्रकरणे निकाली काढून राज्यात हजारो सैनिकांना न्याय देण्यात आला.


    महसूल सप्ताहातच समाजाच्या उन्नतीसाठी’ युवा ही दुवा’ हा उपक्रम राबविण्यात आला. ‘युवा‌ ही दुवा’ हा स्तुत्य उपक्रमात यशस्वी सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता दिसून आली. महसूली व इतर शासकीय सेवा ऑनलाईन देण्यात महाराष्ट्र राज्य वर्षभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य होणार आहे,असे विखे पाटील म्हणाले.


    जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ म्हणाले, महसूल सप्ताहात युवा संवाद आयोजित करण्यात आला. जिल्ह्यात १०७ महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. जिल्ह्यातील ३८ महाविद्यालयांसोबत मतदार जागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. शासनाचे विभाग आता कालानुरूप तंत्रज्ञानस्नेही होत आहेत‌. ऑनलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. शासनाप्रती संवेदना निर्माण करण्याचे काम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा योजनांचा प्रचार – प्रसार करण्यात येईल.
    प्रशिक्षण पूर्ण केलेली विद्यार्थ्यांनी सायली मांडे हिने यावेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सायली मांडे, प्रमोद गांजवे, ऋत्विक खासे, संदीप गोसावी, यशवर्धन कासार, श्रेयस मांडेकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उप विभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. आभार तहसीलदार धीरज मांजरे यांनी मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here