
Punyashlok Ahilyadevi Nagar | नगर : अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत आज मंजूर करण्यात आला. त्यामुळे नगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (Punyashlok Ahilyadevi Nagar) असे करण्यासाठीचा मार्ग राज्य सरकारसाठी अधिक सुकर झाला आहे.
महापालिकेच्या महासभेची मंजुरी (Punyashlok Ahilyadevi Nagar)
नगर महापालिकेचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यानुसार नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. यात नगर महापालिकेतील महासभेतून नामांतराचा प्रस्ताव मांडण्यास सांगितला होता. तसेच या नामांतरासाठी रेल्वे व पोस्ट यांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच जिल्ह्याचे नाव बदलण्याबाबतची अनुशंगिक माहिती मागविली होती.
राज्य सरकारला कळविले (Punyashlok Ahilyadevi Nagar)
नगर महापालिकेत २८ डिसेंबर २०२३पासून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे स्थायी समिती व महासभेतील ठरावांना मंजुरी तेच देत आहेत. अशातच त्यांनी आज नगर शहराच्या नामांतरावर महासभा घेतली. या महासभेत नगर शहराच्या नामांतराला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाशिकच्या विभागीय आयुक्त व राज्य सरकारला कळविण्यात आले आहे. या ठराव मंजुरीमुळे नगर शहराच्या नामांतराच्या प्रक्रियेला अधिक वेग आला आहे. तर या नामांतराच्या मंजुरीनंतर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.