पुणे : पुण्यातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत निर्बंधांमध्ये मोठी शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुण्यातील व्यापारी वर्गाने मागील पाच दिवसांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता पुण्यातील दुकानांसाठी वेळ वाढवून देण्यात आली आहे. तसंच हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे.
पुण्यात निर्बंधांमध्ये शिथिलता
पुणे शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांच्या खाली असल्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याची मागणी करण्यात येत होती. व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होतं. आज अखेर राज्य सरकारकडून पुणेकरांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार आता पुण्यात
सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार
हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार
शनिवार-रविवार सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंत परवानगी
मॉल रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश