
पुणे : बंडु आंदेकर टोळीनंतर आता पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ टोळी पोलिसांच्या रडारवर आली आहे. कोथरुडमधील थरारक गोळीबार आणि कोयत्याने हल्ला प्रकरणी पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळसह 10 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे.
काय घडले?
१७ सप्टेंबर रोजी गणेशनगर, थेरगाव येथे प्रकाश धुमाळ (३६) याच्यावर घायवळ टोळीतील गुंडांनी साईड न दिल्याच्या कारणावरून गोळीबार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर कोथरुडमधील सागर कॉलनीत वैभव साठे (१९) याच्यावर कोयत्याने वार करून त्याला देखील जखमी करण्यात आले.
या घटनेनंतर पुणे शहरात मोठी खळबळ उडाली. कोथरुड पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सहा आरोपींना अटक केली. चौकशीत आरोपींकडे मिळालेली पिस्तूल निलेश घायवळनेच दिली होती आणि गुंडांना दहशत निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे उघड झाले.
मोक्का कारवाई कोणावर?या प्रकरणात पोलिसांनी निलेश घायवळ, मुसा शेख, अक्षय गोगावले, जयेश वाघ यांच्यासह एकूण १० जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी ही माहिती दिली.