पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट हे दोन्ही गेमिंग ॲप्स आजपासून भारतात पूर्णपणे बंद होणार आहेत. पब्जी मोबाइल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स कंपनीने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
टॅन्सेंट गेम्सने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत म्हटलं-
.’पब्जी’ गेम भारतात पूर्णतः बंद केला जातोय, ही फार खेदाची बाब आहे’. यासोबत त्यांनी भारतातील पब्जी मोबाईल आणि पब्जी मोबाईल लाईट या गेमच्या चाहत्यांचे आणि गेमचे समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
कंपनीने असंही म्हटलं आहे की, आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे. सर्व युजर्सची गेम-प्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते. तसेच टॅन्सेंट कंपनी पब्जी मोबाईल विकसित करणारी कंपनी पब्जी कॉर्पोरेशनला (क्राफ्ट्स गेम यूनियनच्या मालकीची कंपनी) सर्व हक्क परत करत आहेत.
आता ज्या युजर्सनी यापूर्वीच हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करुन ठेवला होता, त्यांच्या स्मार्टफोनमध्ये अजूनही हा गेम ॲक्टिव्ह होता. परंतु आजपासून हा गेम त्यांच्या मोबाईलमध्ये चालणार नाही.