Privatization : शिक्षणाचे खासगीकरण व कंत्राटी भरती विरोधात संगमनेरात मोर्चा

    125

    संगमनेर: शिक्षण (Education) हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार असून गोरगरीब, आदिवासी, शेतमजूर यांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क शासन चुकीच्या धोरणातून हिरावून घेत आहे. सरकारने शिक्षणाची प्रयोगशाळा तातडीने बंद करावी. शिक्षण विभागच कंत्राटी पद्धतीने करणार का, असा सवाल करताना शिक्षणाचे खासगीकरण (Privatization) थांबवा अन्यथा मुंबईपर्यंत धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिला.

    शिक्षणाचे खासगीकरण, कंत्राटी भरती, समूह शाळा या निर्णयाविरोधात संगमनेरमध्ये विविध संघटनांच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चापुढे आमदार तांबे बोलत होते.

    तालुका समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक ,शिक्षक ,विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्या वतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला होता. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, प्राचार्य हिरालाल पगडाल, प्रा. भाऊसाहेब चासकर, छात्र भारतीचे अनिकेत घुले यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सुमारे दहा हजार विद्यार्थी पालक व नागरिकांचा विराट मोर्चात सहभागी झाले होते. सरकारच्या विरोधातील घोषणांनी संगमनेर दुमदुमून गेले होते.

    यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. सर्वांना मोफत सक्तीचे व गुणवत्तेचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, शासन खासगी कंपन्यांना सरकारी शाळा देऊन शिक्षणाचे खासगीकरण करत आहे. आदिवासी-वाडी, वस्तीवरील खेड्या पाड्यातील गोरगरिबांच्या मुलांसाठी असलेल्या शाळा बंद करून समूह शाळा करण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे राज्यातील दोन लाख विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हे निर्णय रद्द करावे, अशी आग्रही मागणी केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here