
नगर : नगर जिल्हा सहकारी बँकेत (ADCC Bank) अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर गैरकारभार सुरू झाला असल्याचा आरोप आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केला आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व काही संचालक बँकेच्या पैशांवर विदेश दौरे करत आहेत. भविष्यातही विविध खरेदी प्रकरणांत बँकेत घोटाळे होण्याची शक्यता आहे, असा आरोप त्यांनी नगरमधील राष्ट्रवादी (NCP) भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बँक आहे. माजी आमदार स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या सारख्यांनी ही बँक सक्षम केली. या बँकेला आर्थिक शिस्त लावली. या बँकेत नवीन अध्यक्षाची निवड झाली आणि वारेमाप पैसे खर्च करण्यास सुरूवात झाली. १० ऑक्टोबरपासून बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व काही संचालक विदेश दौऱ्यावर गेले आहेत. बहुतेक ते २६ ऑक्टोबरला येतील. बँकेच्या खर्चातून हा दौरा होत आहे. काही अनावश्य खर्चही करण्याची तयारी सुरू आहे. त्यातून आर्थिक घोटाळा होण्याची शक्यता आहे. बँकेच्या आर्थिक शिस्तीला तडा जाण्याचे काम होत आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होऊ शकतो. राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँकेत फरक असतो. त्यामुळे जबाबदारीने सहकारी बँकेत काम व्हायला हवे. या बँकेत चुकीच्या पद्धतीने चाललेल्या कामा विरुद्ध आम्ही निश्चितच लढा देणार आहेत, अशी नाव न घेता टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर केली.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत तर जिल्ह्यातील एसटी बस बुक करून सामान्य विद्यार्थ्यांचे हाल करू नका. शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपवर नाराज आहे. समूह शाळांच्या नावाखाली दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचे काम होत आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी शाळा बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. निळवंडे कालव्यासाठीचे काम व्हावे यासाठी महाविकास आघाडीने भरीव निधी दिला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला होता. या कालव्यासाठी राहुरी तालुक्यातील शेत व वन जमिनी वर्ग करण्यासाठी आम्ही काम केले. आमची सत्ता गेल्याने काही जण श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र, कामे कोणी केली हे जनतेला माहिती आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यावर सात-आठ महिने या धरणाचे काम बंद होते. राहुरी तालुक्यातील काही जमिनींच्या परवानग्या अजूनही त्यांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पाणी पोहोचलेले नाही. कामे अपूर्ण असताना पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होते आहे, याचे मला आश्चर्य वाटते, अशी कोपरखळीही त्यांनी विखेंचे नाव न घेता लगावली.





