Petrol price : महागाईनंतर आता पेट्रोल-डिझेलमुळे बसणार झटका; तेल कंपन्या किंमती वाढवण्याच्या तयारीत

401

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत नाहीत. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. दरम्यान, सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाहीत. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 5 ते 6 रुपयांनी वाढ करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत सामान्यरित्या मार्जिन राखण्यासाठी प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढ्या राहिल्या तर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक प्रबल सेन यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर 45-47 पैशांनी वाढते. मात्र विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल 25 डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्याने आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी 94 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. 2014 नंतर पहिल्यांदाच क्रूडची किंमत एवढी पातळी गाठली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत 125 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here