Omicron threat : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोनाची लागण

585

Omicron threat in Pune : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट आढळल्यानंतर जगभरातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हेरियंटचा संसर्ग फैलावू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. दुसरीकडे पुणेकरांच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी समोर आली आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून चार प्रवासी आले होते. त्यातील एक प्रवासी पॉझिटिव्ह असल्याची माहिती आता समोर आली आहे. या कोरोनाबाधित प्रवासाला ओमिक्रॉनची बाधा झाली आहे का याचीही चाचणी करण्यात येणार आहे. 

पुण्यात काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून एक नागरिक पुण्यात आला आहे. महापालिकेने त्याची आरटीपीसीआर चाचणी केली असून, त्याचा अहवाल  पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये ओमिक्रॉन हा विषाणूचा व्हेरियंट आहे की नाही हे तपासण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग करावे लागणार असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. 

पुण्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले होते. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या विशेषत: दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, ऑस्ट्रिया, झिम्बाब्वे, जर्मनी, इस्रायल या देशातून कोणी नागरीक आले आहेत का? त्याची माहिती गोळा केली जात आहे.  पुण्यात येण्यासाठी संबंधित देशातून थेट विमानसेवा नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरातून माहिती जमा केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. 

राज्य सरकारनेदेखील काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आता सर्व जिल्ह्यामध्ये कोविड यंत्रणांचा आढावा घेतला जात आहे. संसर्ग पुन्हा फैलावल्यास त्याच्याशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here