
नगर : मराठी मालिकाविश्वात (Marathi Serials) गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळे प्रयोग होत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग करत करत ‘निवेदिता माझी ताई’ (Nivedita Mazi Tai) ही मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेचा प्रोमो आता आऊट (Promo Out) झाला आहे.
‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेतून एक नवीन जोडी प्रेक्षकांना मालिकाविश्वात पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि ऐताशा संझगिरी ही नवी जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. अशोक आणि ऐताशा यांनी याआधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडलेली आहे. आता या नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या माध्यमातून कसे खिळवून ठेवतात,हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
या मालिकेत यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहान मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ आहे. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.
‘निवेदिता माझी ताई’ या मालिकेचा विषयही इतर मालिकांपेक्षा वेगळा आहे. मालिकेची पहिली झलक आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत भावा-बहिणीच्या नात्याची सुंदर गोष्ट बघायला मिळणार आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशा प्रकारचे असेल हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना समजणार आहे. लवकरच सोनी मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.