सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आमदार नितेश राणेंचा आज रात्रीचा मुक्काम रुग्णालयात असणार आहे. प्रकृत्ती अस्वस्थामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर नितेश राणेंना आज सिंधुदुर्ग न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
आमदार नितेश राणे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता त्यांचा आजचा मुक्कामही रुग्णालयातच असणार आहे हे स्पष्ट झालं.
दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीसंतोष परब हल्ला प्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या आमदार नितेश राणे यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सलीम जामदार यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे. आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितलं की, हे प्रकरण गंभीर असल्याने अधिकचा तपास करण्यासाठी नितेश राणे यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी. पण न्यायालयाने ही मागणी नाकारत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.