Nilwande : निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याची घाई करु नये : भांगरे

    147

    अकोले: निळवंडेच्या (Nilwande) डाव्या कालव्याचे काम करताना झालेला हलगर्जीपणा पहिल्या पाणी सोडण्याच्या चाचणीत उघड झाला आहे. त्यावेळी अकोले तालुक्यातील काही गावांमधील शेतकर्‍यांच्या (Farmers) शेतजमिनींचे आणि पिकांचे झालेले नुकसान विचारात घेता निळवंडे (Nilwande) कालव्यातून पाणी सोडण्याची घाई अधिकार्‍यांनी कोणाच्याही दबावाखाली येवून करु नये. अन्यथा पुन्हा धरणावर जावून आम्हांला आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीता भांगरे (Sunita Bhangre) यांनी दिला आहे.

    निळवंडे डाव्या कालव्यातून पाण्याची चाचणी घेण्यासाठी ३१ मे २०२३ रोजी पाणी सोडण्याची घाई करण्यात आली. वास्तविक या कालव्यांची कामे अद्यापही पूर्ण नाहीत. अनेक ठिकाणी कामामध्ये निष्काळजीपणा झाला असल्याने प्रथम चाचणीचे पाणी निंब्रळ, तिटमेवस्ती, मेहेंदुरी या गावातील शेतकर्‍यांच्या शेतामध्ये तसेच कालव्या जवळील काही घरांमध्ये गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही वस्तुस्थिती आपण त्याचवेळी आंदोलन करुन, जलसंपदा अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देत पाणी तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

    आता पुन्हा याच डाव्या कालव्यामधून पाणी सोडण्याचा घाट जलसंपदा विभागाने घातला आहे. केवळ काही लोकांच्या हट्टासाठी या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया होणार असेल तर अकोले तालुक्यातील शेतकरी ती यशस्वी होवू देणार नाहीत. आधी कालव्याची सर्व कामे पूर्ण करा, ज्या भागामध्ये पाण्याची गळती होते, पाण्याचा झिरपा होतो अशा भागातील कामांच्या पूर्ततेबाबतचे सर्व निकष पूर्ण करुनच कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.

    कालव्यांच्या कामातील चुकांकडे दुर्लक्ष करुन, जलसंपदा विभागाने कोणाच्या दबावाखातर किंवा कोणाच्या आदेशाने पाणी सोडले तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला आहे. मागील वेळी शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्याचीच भरपाई शासन अद्याप देवू शकलेले नाही. आता पुन्हा या कालव्यांच्या पाण्यामुळे होणार्‍या नुकसानीचा बोजा अंगावर घेण्याची मानसिकता या भागातील शेतकर्‍यांची नाही, त्यामुळे शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करुन, जलसंपदा विभागाने डाव्या कालव्यातून पाणी सोडताना गांभिर्याने विचार करावा. अन्यथा होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. याबाबत दोनच दिवसांमध्ये शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेवून जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना भेटणार असल्याचेही भांगरे यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here