Newasa News : चालकाला लुटणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी केले जेरबंद

    141

    नेवासा : प्रवासी म्हणून आयशर टेम्पोमध्ये नेवासा फाटा (Newasa Fata) येथून बसलेल्या चार चोरट्यांनी टेम्पो चालकालाच मारहाण करत पैसे लुटल्याची खळबळजनक घटना (Money Robbery) रविवार (ता .१५) रोजी राञी आठ वाजेच्या सुमारास खडका फाटा येथील हॉटेल औदुंबर समोर घडली. 

    या घटनेतील जबरी चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्यासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर  संदीप ढाकणे,पोलीस नाईक अशोक लिपणे, किरण गायकवाड, संदीप बर्डे, पो.कॉ.सुमित करंजकर, पो.कॉ.संदिप ढाकणे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 

    आयशर टेम्पो चालकाने दिलेल्या माहितीवरून नेवासा पोलिसांनी चोरांचा शोध घेत जबरी चोरीतील चारही आरोपींना एका तासाच्या आत गजाआड करण्यात यश मिळविले.रविवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान छञपती संभाजीनगर येथून आयशर टेम्पो हा नेवासा फाटा मार्गे जात असतांना नेवासा फाटा येथे टेम्पो चालक परवेज फकरु शेख याला चार जणांनी हात केला.

    त्यामुळे चालकाने टेम्पो थांबून कुठे जायचे अशी विचारणा केली. यावेळी पंढरपूरला जायचे म्हणून टेम्पोत बसलेल्या चार जणांनी चालकाला दमबाजी करत त्याच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचे कृत्य केले. यामध्ये आरोपी शिवाजी विटकर( रा.नेवासा फाटा), दत्तात्रय भुजंग (रा.नेवासा फाटा,) अमोल मांजरे (रा.झोपडपट्टी नेवासा फाटा), गणेश कचरु भुजंग (रा.मुकिंदपुर) यांचा समावेश आहे. 

    चालकाने खडका फाटा येथील हॉटेल औदुंबरजवळ टेम्पो थांबविला असता या चालकालाच चोरट्यांनी गाडीतील पहाण्याने मारहाण केली. त्याच्या खिशातील १० हजार ६०० रुपये आधारकार्ड घेवून चोरटे पुन्हा अंधाराचा फायदा घेत नेवासा फाट्याकडे पळून गेले. यावेळी वाहन चालकाने पोलिसांना ही माहिती दिली. नेवासा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पोलीसांनी चारही आरोपींना तत्काळ पकडून नेवासा पोलीस ठाण्यात हजार केले. 

    या टेम्पो चालकाला लुटण्याआधी सोमनाथ दिपक बजागे रा.पडळवाडी जि. कोल्हापुर याला सुध्दा नेवासा फाटा येथे मारहाण करुन या चार जणांनी लुटले होते. यावेळी या युवकाचा एक विवो कंपनीचा मोबाईल व खिशामधील ७०० रुपये तयांनी काढून घेतले होते. चोरांची ओळख पटल्याने नेवासा पोलीस ठाण्यात या चार चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल करुन त्यांना गजाआड करण्यात नेवासा पोलीसांना यश आले. या घटनेचा पुढील तपास संदिप ढाकणे करीत आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here