
नेवासा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा बुद्रुक (Newasa Budruk) येथे श्री खंडोबा, म्हाळसादेवी, नारदमुनी, सच्चिदानंद बाबा यांचे नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिराचा चौथा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. तसेच यावेळी चंपाषष्ठीच्या (Champashashthi) निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहातील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व चंपाषष्ठी उत्सवाला “येळकोट येळकोट जय मल्हार” चा जयघोष करत धर्मध्वज पूजनाने (religious flag worship) आज (ता.११) भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.
संत विश्वेश्वर नाथबाबा, श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे, नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज देवगड यांच्या प्रेरणेने उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते १८ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा साजरा होत आहे. या सोहळयाचा प्रारंभ पारायण व्यासपीठ चालक विजय महाराज पवार यांच्या हस्ते धर्मध्वज पूजनाने करण्यात आला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज पेचे, देवस्थानचे अध्यक्ष डॉ.मुरलीधर कराळे, विश्वस्त प्रभाकर बोरकर, गणपत नळकांडे, सर्जेराव चव्हाण, संजय मारकळी, अशोक मारकळी, रविंद्र मारकळी, रमेश काशीद,एकनाथ डोहोळे, सुभाष जपे, एकनाथ रेडे,अशोक काळे,रावसाहेब पेचे, पुंजाराम पेचे, रंजना भाकरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.
श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरी महाराज हे (ता.१७) रोजी सकाळी १० वाजता याठिकाणी भेट देणार आहे. (ता.१८) रोजी सोहळयाचे मार्गदर्शक उध्दव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळयाची सांगता होणार आहे. या सोहळयात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सोहळा कमिटीचे प्रमुख प्रा डॉ.मुरलीधर कराळे व विश्वस्त मंडळांसह ग्रामस्थांनी केले आहे.