Nashik News : नाशिकमध्ये तस्कर आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये झटापट, हवेत गोळीबारही, तस्करीचा डाव उधळला!

340

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) कातडीची तस्करी करताना वनविभागाने (Nashik Forest) चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. बिबट्याच्या कातडीसह संशयितांना ताब्यात घेताच एकच खळबळ निर्माण झाली आहे. इगतपुरी वनविभागाने (Igatpuri Forest) ही कारवाई केली आहे.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरातील जव्हार रोडवरील (Javhar Road) अंबोली फाट्यानजीक ही कारवाई करण्यात आली आहे. त्र्यंबकजवळील अंबोली जंगल परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती इगतपुरी प्रादेशिक वनविभागाला मिळाली. त्यावरुन इगतपुरी वनविभागाचं विशेष पथक अंबोलीकडे रवाना झाले.

यावेळी इगतपुरी वनपथकाने बनावट ग्राहक बनून संशयितांना ताब्यात घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे बनावट ग्राहक बनून काही वन कर्मचारी संशयिताकडे गेले. तर काही कर्मचारी हे इशाऱ्याची वाट पाहत थांबले. ठरलेल्या ठिकाणी संबंधित संशयित इसम आल्यानंतर बनावट ग्राहक बनून गेलेल्या वन कर्मचारी सावध झाले. मात्र घटनास्थळी याउलट घडले. संशयितांना बनावट ग्राहकांचा संशय आल्याने वन कर्मचारी आणि संशयित यांच्यात झटापट झाली.

दरम्यान झटापट एवढी वाढली की उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना हवेत गोळीबार करणे भाग पाडले. त्यानंतर संबंधित चौघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बिबट वाहनाची कातडी आणि दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. यामध्ये प्रकाश लक्ष्मण राऊत, परशुराम महादू चौधरी, यशवंत हेमा मौळी, हेतू हेमा मौळी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान इगतपुरीच्या वनकर्मचाऱ्यांनी वेळीच सावध पवित्रा घेत मोहीम फत्ते केली. या कारवाईत पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी चे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन उमाकांत बिरारीस आणि टीम सहभागी होती.

अंबोली फाटा परिसर तस्करांचा अड्डा दरम्यान त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली फाटा परिसर तस्करांचा अड्डा बनत चालला आहे. अंबोली गावाच्या काही अंतरावर हा फाटा लागतो. येथून सरळ रस्ता जव्हार मार्गे गुजरातकडे तर दुसरा हरसूल मार्गे गुजरातकडे जाणारा आहे. शिवाय या दोन्ही रस्त्यांना जंगलाला व्यापलेले आहे. तसेच अनेक पळवाटा असल्याने अनेकदा या मार्गाने वाहतूक होते. गेल्या काही वर्षांत या परिसरात अनेक अवैध मुद्देमाल हस्तगत केल्याच्या घटना आहेत. त्यातच आज बिबट कातडीच्या तस्करीचा डाव उधळण्यात आला. सध्या या बिबट्याची शिकार नेमकी कुणी व कुठे केली? यासह विविध प्रश्नांच्या उत्तरांचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here