मुंबई : मुंबईतल्या भुलेश्वर परिसरात एका सोन्याच्या दुकानात 8 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी(Gold theft) करून राजस्थानला पळून गेलेल्या 10 जणांना मुंबई पोलिसां(Mumbai Police)नी अटक केली आहे. भुलेश्वर परिसरात सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी खुशाल टामका यांच्या दुकानात ही सोन्याची चोरी झाली होती. त्यानंतर एलटी मार्ग पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही पोलिसांना मिळू नये म्हणून सीसीटीव्हीचा डिव्हीआरही पळवून नेला होता. एलटी मार्ग पोलिसांनी 6 वेगवेगळी पथके तयार करून तपासाला सुरुवात केली. त्यावेळी हे चोरटे भुलेश्वर ते बोरोवली ओलाने गेले असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एका खाजगी इनोव्हा गाडीच्या माध्यमातून राजस्थानपर्यंतचा प्रवास त्यांनी केला होता असं पोलिसांनी सांगितलं.
मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलिसांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. एलटी मार्ग पोलिसांनी या गुन्ह्याचा कमी वेळात उलगडा करून 10 आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला 90 टक्के मुद्देमालही परत मिळवला. सोने व्यापारी टामका यांच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामागारानेच या चोरीचा कट रचला आणि मित्राच्या मदतीने ही चोरी केल्याचं तपासात उघड झालं आहे.
आरोपीनी हे सोने राजस्थानमधल्या सिरोहीमध्ये नेऊन शेतात 6 फूट खोल खड्ड्यात पूरून ठेवलं होतं. मात्र मुंबई पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर ते परत मिळवण्यात यश आलं. सुरुवातीला या चोरीच्या गुन्ह्यात फक्त 4 आरोपींचा सहभाग होता. मात्र राजस्थानच्या सिरोही गावात पोहोचल्यानंतर आपल्या मागे पोलीस लागलेत हे लक्षात येताच आरोपींनी हे सोने वेगवेगळ्या इसमांकडे ठेवायला दिलं आणि त्यांनीही या कटात सहभाग दर्शवला. पोलिसांनी चार टप्प्यात केलेल्या तपासात एकूण 10 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर उर्वरित दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.