Mumbai Corona Update : कोरोना महामारीची तीव्रता आता काहीशी कमी होताना दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने अजूनपर्यंत आजची आकडेवारी जाहीर केली नसली तरी एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्रसार्वजनिक आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 38 कोरोनाबाधित आढळले आहेत. तसंच एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. दरम्यान मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या आजही आटोक्यात दिसून आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हून कमी दिसत आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या सातत्याने कमी होत आहे. या आठवड्यात दुसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. याआधी 2 मार्चला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 225 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 461 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 18 एप्रिल 2020 नंतरचा राज्यातील आजचा सर्वात कमी रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 17 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे.