मुंबई : राज्यातील सर्व शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील शाळांबाबत ठोस माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती, काही तासांपूर्वीच मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी मुंबईतील शाळा 27 जानेवारीपासून (Mumbai Schools) सुरू होण्याची शक्यता वर्तवली होती, मात्र आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईतील शाळा 24 जानेवारीपासून सुरू होणार (School Starting Date) असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या सोमवारीच मुंबईतील शाळांचीही घंटा वाजणार हे नक्की झालं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने शाळा सुरू करण्याची पालिकेची तयारी आहे, ज्यांना शाळेत यायचे आहे ते शाळेत येऊ शकतात, ज्यांना यायचं नाही, ते ऑनलाईन सहभाग नोदवू शकतात, अशीही माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला मुकले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हलचाली सुरू केल्या गेल्या आहेत. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
मुंबईतील शाळा 27 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील शाळांबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय. पालक, डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जातील. आठवड्यापासून पुण्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढतेय. या सगळ्याचा विचार करुनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं मोहोळ म्हणाले.
औरंगाबादेतील शाळा सध्या तरी सुरु होणार नाहीत. महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी याबाबत तोंडी माहिती दिली आहे. औरंगाबादेत पॉझिटिव्हिटी रेट 35 टक्के असल्यानं वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेण्यात आलीय. सोमवारनंतर आठ दिवस परिस्थितीचं निरीक्षण केलं जाईल. त्यानंतर परिस्थिती योग्य असेल तरच शाळा सुरु करणार असल्याचं पांडे यांनी सांगितलं.