
नगर : नारायण डोह (ता. नगर) परिसरातील सेंट मायकल शाळेतील मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात एका पालकाने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नऊ वर्षांच्या लहान मलाहा मारहाण व धमकाविण्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल करून घेतला आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करत शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निवेदन देण्यात आले. यात नोंदिता डिसोजा यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट)मध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक दिनाच्या पवित्र दिवशी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नात्यात दहशत माजवण्याची घटना नगरमधील सेंट मायकेल या कॉन्व्हेन्ट शाळेत घडली. एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला या शाळेच्या नोंदिता डिसोझा नावाच्या मुख्याध्यापिकेने विनाकारण फक्त स्वतः च्या रागामुळे आणि स्वतः च्या तापट व गर्विष्ठ स्वभावामुळे बेदम मारहाण करत, बंद खोलीत डांबून जिवे मारण्याच्या धमकी पर्यंत मजल मारली. या मुख्याध्यापिकेबद्दल पूर्वी सुद्धा शेकडो पालकांच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत की या मुलांना आणि पालकांना अत्यंत हिन वागणूक देते. छोट्या चुकांवर मुलांवर आणि पालकांवर दहशत करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करून शाळेत सर्वांसमोर अपमानास्पद वागणूक देते. या मुख्याध्यापिकेला कुणाचीही भीती नाही, अश्या व्यक्ती इतक्या महत्वाच्या पदावर बसणं धोकादायक आहे, हे या प्रकारातून समोर आले आहे. त्या आता या प्रकारातून स्वतः ची सुटका करून घेण्यासाठी शाळेतील शिक्षकांना सुद्धा ब्लॅकमेल करत आहेत.
या मुख्याध्यापिकेची शाळेत प्रचंड दहशत आहे. या कारणाने कोणतेही पालक पुढे येत नाही. या बाबत पोलिसांत फिर्याद देखील दाखल झालेली आहे. या मुख्याध्यापिकेला काळ्या यादीत टाकून तात्काळ शाळेच्या प्रशासनाला आदेश द्यावेत की, ही व्यक्ती पुन्हा शाळेत कोणत्याही पदावर दिसता कामा नये. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अशा जबाबदार पदांवर बसणं समाजासाठी धोक्याची घंटा आहे. तात्काळ या बाबत आदेश काढले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला आणि त्या शाळेतील मुख्याध्यापकाच्या कार्यालयाला ताळे लावा आंदोलन हातात घेईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.





