Mask : रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही; वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना

404

मुंबई: तुम्ही जर रेल्वेचा प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेचा प्रवास करत असाल तर मास्क घाला असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे प्रवास करताना मास्कची सक्ती नाही हेही रेल्वेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

रेल्वे मंत्रालयानं याबाबत एक परिपत्रक जारी केलं असून त्याबाबतच्या विस्तृत सूचना या सर्व झोनना देण्यात येणार आहेत. यामध्ये कोरोनाचा धोका लक्षात घेता प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं सांगण्यात येत आहे. पण ही मास्क सक्ती नाही असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्या राज्यामध्ये मास्कची सक्तीही करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत त्या राज्यांमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर करावं.

महाराष्ट्रासारख्या काही राज्यांमध्ये मास्कचे बंधन हटवण्यात आलं आहे. अशा राज्यांमध्ये प्रवास करताना जर एखाद्याने मास्क वापरला नाही तर त्याचा दंड लागणार नाही, पण तरीही प्रवाशांनी मास्कचा वापर करावा असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

मुंबईत गेल्या 10 दिवसांत सक्रिय रुग्णसंख्या 35 टक्क्यांनी वाढलीदेशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत मंगळवारी 1 हजार 118 रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच दिल्लीपाठोपाठ आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असं असलं तरी, रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही.

देशातील रुग्णसंख्येतही वाढ देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Covid-19) व्हायरसच्या 2 हजार 897 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या (Coronavirus Active Patients) वाढली असून 19 हजार 494 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 0.61 टक्क्यांवर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here