Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी माजी सैनिकाच्या पत्नीचा आत्महत्येचा इशारा

    152

    नगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला नगरमधील माजी सैनिकाच्या पत्नीने पाठिंबा दिला आहे. आरक्षण न मिळाल्यास आत्महत्या (suicide) करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

    त्यांनी राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमचा महाराष्ट्राचा वाघ मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या अगोदरही त्यांनी १३ दिवसांचे उपोषण केले होते. सगळ्यात जास्त विश्वास त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दाखविला होता. मात्र, आपले नाकर्ते सरकार अजूनही काहीचं करताना दिसत नाही. नुसत्या बैठका घेऊन उपयोग नाही तर आम्हा सगळ्याचं मराठ्यांना आमचा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हवे आहेत. त्यांचे उपोषण हे तुमच्याकडून सुटू शकते. आपणास विनंती आहे की, आरक्षण तर आम्ही मिळवू मात्र, आमचा वाघ आम्हाला हवा आहे. त्यामुळे आमचा मराठ्यांचा अंत पाहू नका. आरक्षण तर आम्हाला आमच्या हक्काचं मिळणारच, मात्र, आम्हाला आमच्या मनोज जरांगे पाटलांना गमवायचे नाही.

    जरांगे पाटलांच्या जिवीताला काही झाले तर संपुर्ण महाराष्ट्र पेटून उठेल आणि त्याची सुरूवात झालेली आहे. याला जबाबदार सरकार असणार आहे. आपणास विनंती आहे आपण स्वत:एकदा जरांगे पाटलांशी चर्चा करावी. कारण ते औषधोपचार ही घेत नाहीत आणि पाण्याचा एक थेंबही घेत नाही. बैठका नंतर घ्या. आमच्या वाघाशी चर्चा करून आधी त्यांना वाचवा. सरकारने काहीचं उपाययोजना त्वरीत केल्या नाही तर असे समजायला हरकत नाही की सरकारचं जरांगे पाटलांना अन्नपाण्यावाचून आत्महत्या करायला भाग पाडत आहे.

    मी माजी सैनिक पत्नी असून आम्हा सैनिक परिवाराला सवय लागलेली असते की सैनिक कधीही देशरक्षण करताना शहीद होऊ शकतो. मी आपणास सांगू इच्छिते की जरांगे पाटलांच्या जिवीतास काही बरे-वाईट झाले तर माझ्यासह अनेक लोक आत्महत्या करून या मराठ्यांच्या आरक्षण आंदोलनात शहीद होतील आणि याला जबाबदार फक्त सरकार असेल. उपोषण सुटण्यासाठी तत्काळ प्रयत्न करा. कारण जरांगे पाटील पाणी देखील घेत नाही. त्यामुळे त्यांच्या किडनी फेल होऊ शकतात. यामुळे मेंदूही निकामी होऊ शकतो. त्यांच्या प्रत्येक अवयवावर काही दुष्परिणाम होण्याआधी हे उपोषण थांबवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here