Manoj Jarange patil : ‘संघर्षयोद्धा’- मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

    122

    नगर : मराठा समाज हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे, यासाठी झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या ‘संघर्षयोद्धा’ (Sangharshyoddha) मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 

    अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगेंची भूमिका (Manoj Jarange patil)

    सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे “संघर्षयोद्धा” – मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे. गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली असून सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे, तर शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले, सिद्धेश्वर झाडबुके यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

    मनोज जरांगेंचा संघर्ष रुपेरी पडद्यावर  (Manoj Jarange patil)

    महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळीच ओळख आहे. इतिहासात शेतकरी आणि योद्धे म्हणून मराठ्यांना ओळखले जायचे. मराठ्यांच्या आरक्षणासाठी ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत २०१६ मध्ये राज्यभर भव्य मोर्चे निघाले होते. त्यानंतर राज्य सरकारने  दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. अंतरवाली सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन, उपोषणे करून त्यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. त्यांना राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

    अत्यंत साध्या अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या  चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केल्यापासूनच लोकांमध्ये या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमधून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचं चित्रण या चित्रपटातून लोकांसमोर येणार आहे. येत्या २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here