
Manoj Jarange Patil : नगर : सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची (Ordinance) अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा अंतरवली-सराटी (Antarwali Sarati) येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांचा आज उपोषणाचा चाैथा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उठता, बसता येत नाहीय. आवाजही त्यांचा बिघडला आहे. सध्या त्यांच्या सहकाऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून चिंता वाढली आहे.
उपचार घेण्यास नकार (Manoj Jarange Patil)
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. अंतरवालीत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून, गावकरी, मित्र सहकारी त्यांना वारंवार पाणी पिण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह करत आहेत. सोमवारी रात्री जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी देखील जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपण उपोषण सोडणार नसून, पाणी देखील पिणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र बंदची हाक (Manoj Jarange Patil)
जरांगे यांनी गेल्या चार दिवसांत पाण्याचा घाेट देखील घेतला नाही. सोबतच तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्यास आणि तपासणी करण्यास देखील जरांगे यांनी नकार दिला आहे. तर, त्यांची प्रकती खालावत असल्याने गावकऱ्यांसह जरांगे यांचे सहकारी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, सकल मराठा समाजाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे सरकार थेट मराठा आरक्षणाबाबत २० फेब्रुवारीला एक दिवसांचे अधिवेशन घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.