Mangal Kalash : अक्षदा मंगल कलशाचे कर्जतमध्ये स्वागत

    151

    Mangal Kalash : कर्जत : २२ जानेवारीला अयोध्येत नवनिर्मित भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pranapratistha of Shriram’s idol) होणार आहे. त्यानिमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षदा व मंगल कलशांचे (Mangal Kalash) शनिवारी (ता.१६) कर्जत शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामदैवत संत सदगुरु गोदड महाराजांच्या (Saint Sadguru Godad Maharaj) मंदिरात आरती झाली. 

    प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, वारकरी दिंडी, घोडेस्वार, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत सायंकाळी संत सदगुरु गोदड महाराज मंदिरापासून भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथात अयोध्येहून आलेल्या अक्षदा व मंगल कलश विधिवत पूजा करीत सर्वसामान्य नागरिक आणि रामभक्तांच्या उपस्थित पुष्पवृष्टी करून ठेवण्यात आले. अक्षदा व मंगल कलशाचे ठिकठिकाणी भाविकांनी दर्शन घेत स्वागत केले.

    हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातून देखील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आले होते. चौकाचौकात मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. गोदड महाराज मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारतळात झाला. यावेळी महाआरती झाली. जय श्रीराम घोषणेने परिसर दुमदुमला होता. २२ जानेवारीला अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमासाठी कर्जत शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक जाणार आहे. या शोभायात्रेत आमदार राम शिंदे यांच्यासह स्थानिक सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, श्रीरामभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here