Mahavitaran : वीजबिल तर भरताच, मग दंड का देता? : महावितरण

    154

    नगर : राज्यामध्ये चालू आर्थिक वर्षात दरमहा सरासरी १२ लाख घरगुती वीज ग्राहकांनी वीज बिल (electricity bill) तर भरले, पण बिल भरण्याची मुदत न पाळल्यामुळे त्यांना दंड भरावा लागला. वीज ग्राहकांनी वेळेत बिल भरून दंड टाळावा, तसेच वेळेपूर्वी आणि ऑनलाईन बिल (Online bill) भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण (Mahavitaran) चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

    ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना वीज बिलातील सवलतीचा लाभ मिळवून देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. लोकेश चंद्र म्हणाले, ”चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल २०२३ नंतर महावितरणचे विविध वर्गवारीतील दरमहा सरासरी एकूण १३ लाख ८९ हजार असे ग्राहक आढळले आहेत.

    ज्यांनी नियमितपणे वीजबिले भरली, पण बिल भरण्याच्या देय दिनांकानंतर बिल भरल्याने त्यांना सव्वा टक्का दंड द्यावा लागला. यात १२ लाख ३१ हजार घरगुती ग्राहक आहेत. व्यावसायिक ग्राहकांची संख्या १ लाख ३३ हजार आहे, तर औद्योगिक ग्राहकांची संख्या १७ हजार आहे. महावितरणच्या वीज बिलावर मुदतीचा स्पष्ट उल्लेख असतो. बिल अथवा देयक दिनांकापासून २१ दिवसांत बिल भरायचे असते. त्यानंतर बिल भरले तर सव्वा टक्का दंड द्यावा लागतो. हा दंड टाळण्यासाठी देय दिनांकपर्यंतच बिल भरावे.”

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here