Maharashtra Electricity : महानिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी; २७ औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती

458

Maharashtra Electricity : मागील काही दिवसांपासून राज्यात विजेची मागणी वाढली असताना वीज पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. अशातच महानिर्मितीने ऐतिहासिक कामगिरी केली असल्याचा दावा केला आहे. बुधवारी, 27 एप्रिल रोजी महानिर्मितीच्या सर्व 27 औष्णिक संचातून वीजनिर्मिती करण्यास यश मिळाल आहे. मागील काही महिन्यांपासून महानिर्मितीकडून यासाठी प्रयत्न सुरू होते.

राज्यामध्ये सातत्याने वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक केंद्र येथील 7 औष्णिक संच, कोराडी येथील 4 संच, तसेच नाशिक, भुसावळ व परळी येथील प्रत्येकी 3 संच, खापरखेडा येथील 5 संच व पारस येथील 2 अशा एकूण 27 औष्णिक संचामधून लक्षणीय वीजनिर्मिती सुरु असल्याची माहिती महानिर्मितीकडून देण्यात आली. सर्वच्या सर्व 27 औष्णिक संचांमधून वीजनिर्मिती सुरु असण्याची महानिर्मितीच्या सुमारे 60 वर्षांच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याची माहितीदेखील अधिकाऱ्यांनी दिली.

महानिर्मितीने ‘मिशन 8000 मेगावॅट’ हे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सद्य स्थितीत सर्व संच कार्यरत कसे राहतील याकडे प्रकर्षाने लक्ष दिलेले असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संचांच्या उपलब्धतेकडे विशेष भर देण्यात आला असल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात सध्या महानिर्मितीकडून औष्णिक वीज निर्मिती ही 7000 ते 7500 मेगावॅटच्या दरम्यान होत असते. कोळसा टंचाईच्या विपरीत परिस्थितीत महानिर्मितीच्या वरिष्ठ व्यवस्थापन-अभियंते, तंत्रज्ञ व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून ही कामगिरी साध्य झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा विक्रमी टप्पा गाठल्याबद्दल उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांचे आणि महानिर्मितीच्या अधिकारी, अभियंते, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here