Gold Rate Today: वर्षभरात सोने-चांदीत ८ हजारांची घसरण; दिवाळीत मोठी वाढ होण्याची शक्यता, पाहा आजचे दर!
गेल्या वर्षी कोरोना काळात मोठी भाववाढ झालेल्या सोने-चांदीत वर्षभरात तब्बल ८ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी ५७ हजार २०० रुपयांवर असलेले सोने सध्या ४९ हजारांवर, तर ७७ हजार ५०० रुपयांवर असलेली चांदी ६९ हजार ५०० रुपयांवर आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी २१ मार्च २०२० रोजी सोने ४३ हजार रुपये प्रती तोळा, तर चांदी ३९ हजार रुपये प्रती किलोवर होती. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान मल्टीकमोडिटी मार्केटमध्ये मोठी उलाढाल सुरु राहून सोने- चांदीचे भाव वाढत गेले. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर २३ जून २०२० रोजी सोने ४९ हजारांवर, तर चांदी ५० हजारांवर पोहोचली होती.
रशियाने कोरोना प्रतिबंधक लस आल्याचे जाहीर केल्यानंतर १२ ऑगस्ट २०२० रोजी एकाच दिवसात सोने ४ हजार, तर चांदीत १२ हजारांची घसरण झाली. त्यानंतर चढ-उतार सुरुच राहून १३ नोव्हेंबर २०२० रोजी धनत्रयोदशीच्या मुहूर्तांवर पुन्हा घसरण होऊन सोने ५१ हजार १००, तर चांदी ६३ हजार ५०० रुपयांवर आली होती.
वर्षभराचा विचार केला तर सोन्यात ८ हजाराने घसरण होऊन ते ५७ हजार २०० वरुन ४९ हजार रुपये प्रती तोळ्यावर आले आहे. अशाच प्रकारे चांदीतही ८ हजारांची घसरण होऊन ती ७७ हजार ५०० रुपयांवरुन ६९ हजार ५०० रुपये प्रती किलोवर आली आहे.
सध्या सोने-चांदीचे भाव कमी झाले असून, या काळात गुंतवणूक करण्यात संधी असल्याचे सांगितलं जात आहे. कोरोनामुळे सोने- चांदीत गुंतवणूक वाढत असून, दिवाळीपर्यंत या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा वाढ होऊन सोने ५२ हजार, तर चांदी ७५ हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.
लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.