
Madhukar Pichad | महाराष्ट्रातील राजकारणात एककाळ मधुकर पिचडांचे (Madhukar Pichad) वजन होते. मात्र, आता पिचड नावाचे ते वलय ओसरताना दिसत आहे. पिचड पिता-पुत्रांसारखे मोठे नेते असूनही भारतीय जनता पक्षाची (BJP) आदिवासी भागातील चिंता मिटलेली नाही. भाजपच्या राष्ट्रीय बैठकीत महाराष्ट्रातील आदिवासी भागांत पक्ष वाढीवर चर्चा झाली. यात काही उपाययोजना ठरल्या. यात पिचडांपेक्षा नवीन रणनीती ठरविण्यात आली.
मधुकर पिचड हे महाराष्ट्रात आदिवासींचे नेते म्हणून ओळखले जात होते. १९८० ते २०१४ पर्यंत ते अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. सात वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. त्यातील चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादीकडून ते आमदार झाले. १५ वर्षे ते मंत्री होते. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विकास विभागाचे मंत्रिपद त्यांना मिळालं. भारतातील पहिले आदिवासी विकास विभागाचे बजट सादर करण्याचा मान त्यांना मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते एककाळचे निष्ठावान समर्थक. मात्र, त्यांची निष्ठा फिरली आणि पवारांची वक्रदृष्टीचे ते शिकार झाले. २०१९मध्ये त्यांचे पूत्र तत्कालीन आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत ‘कमळा’चा साथ देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पिचडांचे ताकद क्षीण होत गेली. यातच मधुकर पिचडांना वयोमानाने जास्त फिरणेही शक्य होईना. भाजपने पिचडांच्या रुपात मोठा आदिवासी नेता गळाला लावला. मात्र, मधुकर पिचडांचे मन काही लागेना. अखेर माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना त्यांना श्रद्धा व सबुरीचा कानमंत्र देण्यासाठी राजूरला जावे लागले होते.
पिचडांना घेण्यामागे भाजपची रणनीती स्पष्ट होती. आदिवासी भागांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वनवासी कल्याण आश्रमाचे काम चांगले आहे. मात्र, त्यांना या भागांत भाजपला जनाधार मिळवून देता आलेला नाही. हे काम पिचडांच्या माध्यमातून होईल आणि भाजपची ताकद वाढेल, असे पक्ष नेतृत्वाला वाटले होते. मात्र, शरद पवार व अजित पवारांनी पासे उलटे पाडले. पिचडांना होमग्राउंडवरच अडकविले. वैभव पिचड २०१९च्या निवडणुकीत पराभूत झाले. पिचडांना अकोले नगरपंचायत ताब्यात ठेवता आली. मात्र, ते राहत असलेल्या राजूरची ग्रामपंचायत गमवावी लागली. पुढे ‘अगस्तीं’चा वरदहस्तही गमावला. यातच मधुकर पिचडांनाही वयोमानाने फिरणे कमी झाले. त्याचा परिणाम जनसंपर्कावर झाला. पिचडांना अकोलेतच अडकवू ठेवल्याने भाजपला पिचडांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही.
मधुकर पिचडांची एक काळ पालघर परिसरात चांगली चलती होती. तेथेही भाजपला जास्त ताकद वाढविता आली नाही. नाशिक येथे राज्यातील आदिवासी संमेलनात पिचडांना आमंत्रित करण्यात आले नाही. शरद पवारांना नरहरी झिरवळांना तेथे चांगलाच मान मिळवून दिला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, सुरगणा, दिंडोरी या आदिवासी पट्ट्यात भाजपला ताकद वाढविता आली नसल्याची चिंता भाजपला आहे. नाशिक, नंदुरबार, पालघर व विदर्भातील आदिवासी भागांत आपले पक्ष संघटन वाढविण्याच्या सूचना भाजप पक्ष नेतृत्वाने दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बैठकीत दिलेल्या आहेत. त्यामुळे या भागातील कम्युनिस्टांची ताकद कमी करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील पक्ष संघटनेला करावा लागणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपच्या भात्यात पिचडांसारखे ब्रम्हास्त्र असूनही मोठी पंचाईत झाली आहे. महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळविण्याचे भाजपचे स्वप्न आहे. या स्वप्नपूर्तीसाठी आदिवासी भागांतील कम्युनिस्ट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी करण्यावर ‘लक्ष्य’ दिले जात आहे.