
केंद्र सरकारने सोमवारी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ जाहीर केली. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल यावरील उत्पादनशुल्कात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्यात आली. मात्र, ग्राहकांसाठी किरकोळ विक्रीचे दर कायम राहणार आहेत. कॉम्प्रेस्ड नॅचलर गॅस अर्थात सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे.
नव्या दरपत्रकानुसार देशातील उज्ज्वला लाभाथ्यांसाठी 15 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर यापुढे 500 रुपयांऐवजी 550 रुपयांना उपलब्ध असेल. तर सामान्य ग्राहकांसाठी तो 803 रुपयांऐवजी 853 रुपयांना असेल. पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ विक्रीचे सध्याचे दर कायम राहतील, असे तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
जगभरात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याचा लाभ भारताला मिळू शकतो. कारण, भारतातील कच्च्या तेलापैकी 85 टक्के तेल आयात केले जाते. या शुल्कवाढीमुळे केंद्र सरकारला अतिरिक्त महसूल मिळणार आहे. तोही ग्राहकांवर कोणताही बोजा न पडता.