जिनोम सिक्वेन्सिंग वाढवा, सतेज पाटील यांचे आदेश
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढ आटोक्यात येत असतानाच आता जिल्ह्यावर डेल्टा प्लस नवं संकट घोंगावत आहे. जिल्ह्यात रविवारी सात नवे डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण सापडले असून यामध्ये चार शहरातील तर तीन ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे. जून महिन्यात या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. जिल्ह्यात डेल्टा प्लसचे एकाच वेळेस सात रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असून आरोग्य प्रशासन खडबडून जागे झालंय. पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील तात्काळ आरोग्य विभागाची बैठक घेऊन तालुकास्तरावर जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
डेल्टा प्लस संदर्भात राज्य सरकार उपाय योजना करत असून अशा रुग्णांचा इंडेक्स करण्यात आला असून त्यांची पार्श्वभूमी आम्ही जाणून घेत आहोत. डेल्टा प्लसच्या रुग्णांना टेस्टिंग करून उपचार देत आहोत. 18 लोकांनी लस घेऊनही डेल्टा प्लस झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात जे पाच मृत्यू झाले आहेत ते डेल्टा प्लसने झालेले नाहीत. इतर व्याधी आणि वय जास्त असल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचे राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच राज्यातील नागरिकांनी कोरोना बाबतीतल्या सूचनांचे पालन केले पाहिजे असे आवाहन केले आहे.