
कर्जत : गणेश उत्सव (Ganesh Festival) आणि ईद-ए- मिलाद (Eid-e-Milad) च्या पार्श्वभूमीवर कर्जत (karjat) पोलिसांनी नूतन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.१८) संध्याकाळी कर्जत शहरात पथसंचलन आणि दंगा काबू प्रात्यक्षिक (Riot Control Demonstration) पार पाडले. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत पोलीस विभाग सतर्क असल्याचा इशारा त्यांनी शहरवासीयांना दिला.
मंगळवार (ता. १९) रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. कर्जत शहर आणि तालुक्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कर्जतचा पोलीस विभाग सज्ज आहे. सोमवारी कर्जतच्या आठवडे बाजाराच्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पोलीस ठाणे ते कर्जत बसस्थानक परिसर शहरातून पोलिसांचे पथसंचलन पार पाडले.
बस-स्थानक परिसरात दंगा काबू प्रात्यक्षिक पार पडून कर्जत पोलीस विभाग कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क असल्याचा इशारा पोलिसांनी कर्जत शहरवासीयांसह संपूर्ण तालुक्याला दिला. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, निवासी नायब तहसीलदार महादेव कारंडे, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, होमगार्ड विभागाचे मुन्ना पठाण, गुप्तचर विभागाचे महादेव कोहक यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड जवान उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय पथक देखील संचलनात सहभागी झाले होते.रीतसर पोलीस विभागाची परवानगी घेत सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा, पोलीस दल जनतेच्या संरक्षणासाठी आणि सुव्यवस्थेसाठी असून सण-उत्सव शासनाने ठरवून दिलेल्या नियमाला अनुसरून पार पाडावे,असे आवाहन पोलीस निरीक्षक बळप यांनी केले आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्याला कठोर शासन करण्यात येईल,असा इशारा देखील देण्यात आला आहे.