
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध शिगेला पोहोचले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांनी राजधानी तेहरान ताबडतोब रिकामी करावी असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे इस्रायलने आधीच नागरी लक्ष्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की इराणने अणु करारावर स्वाक्षरी करायला हवी होती.
ट्रम्पने म्हटले आहे की, ‘मी त्यांना ज्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते त्या करारावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. हे खूप लाजिरवाणे आणि मानवी जीवन उद्धवस्त करणारे आहे. इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. मी हे वारंवार सांगितले आहे. सर्वांनी ताबडतोब तेहरान रिकामे करावे.’
सोमवारी कॅनडामध्ये सुरू झालेल्या G7 शिखर परिषदेत, जागतिक नेत्यांनी इस्रायल आणि इराणमधील वाढता तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दोन्ही देशांना त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘त्यांनी बोलले पाहिजे आणि ते त्वरित करावे.’
ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, सर्व G7 देश सहमत आहेत की संघर्ष वाढण्यापासून रोखणे महत्वाचे आहे, कारण त्याचा गाझामधील परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. ट्रम्प यांनी G7 शिखर परिषदेच्या सुरुवातीलाच सुचवले की रशिया आणि कदाचित चीनलाही या गटात समाविष्ट केले पाहिजे. त्यांनी सांगितले की G7 ला G8 किंवा G9 बनवता येईल.
ट्रम्प यांनी २०१४ मध्ये G8 मधून रशियाला काढून टाकणे ही ‘खूप मोठी चूक’ असल्याचे म्हटले. त्यांनी दावा केला की, ‘जर त्यावेळी रशियाला काढून टाकले नसते आणि मी अध्यक्ष असतो तर हे रशिया युक्रेन युद्ध झाले नसते.’इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी सांगितले की इस्रायलने इराणवरील हल्ल्यांमुळे त्यांचा अणुकार्यक्रम ‘खूप काळासाठी’ मागे पडला आहे. नेतन्याहू म्हणाले की इस्रायलचे उद्दिष्ट इराणचे सरकार पाडणे नाही, परंतु हल्ल्यांमुळे असे घडले तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही. ते म्हणाले, ‘शासन खूप कमकुवत आहे.’ नेतन्याहू म्हणाले की ते ट्रम्प यांच्या सतत संपर्कात आहेत.