Pakistani Hindus Left India: पाकिस्तानातून अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या रोज समोर येताना दिसतात. या अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू समाजातील लोकांचाही समावेश आहे. यापैकी अनेक भारतीय नागरिकत्वासाठी सातत्याने अर्ज करत आहेत. अशातच एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, 800 पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व न मिळाल्याने त्यांना पाकिस्तानात परतावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.
द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भारतातील पाकिस्तानी अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या सीमांत लोक संघटनेने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. या अहवालात सांगण्यात येत आहे की, भारतातील नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या 800 हिंदूंनी पाकिस्तानात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे, कारण त्यांच्या नागरिकत्वाच्या बाबतीत प्रकरण पुढे जात नव्हते आणि कोणतेही ठोस उत्तर देखील त्यांना दिले जात नव्हते.
द हिंदूच्या वृत्तानुसार, सीमा लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंग सोढा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, जेव्हा हे सर्व हिंदू पाकिस्तानात पोहोचले, तेव्हा त्यांचा भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी वापर करण्यात आला. या सर्वांची प्रसारमाध्यमांसमोर परेड करण्यात आली आणि त्यांना जबरदस्तीने भारतात वाईट वागणूक मिळत असल्याचे माध्यमांना सांगा म्हणून सांगण्यात आले.
काय आहे भारतातील नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया?वर्ष 2018 मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतीय नागरिकत्व हवी असणाऱ्यांसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले. ज्याच्या मदतीने शेजारील देशांमध्ये छळ होत असलेले लोक भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. यासाठी देशातील 7 राज्यांमध्ये 16 कलेक्टर तैनात करण्यात आले होते. जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्या हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन आणि बौद्ध धर्मातील लोकांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारतात. यानंतर मे 2021 मध्ये आणखी पाच राज्यांतील 13 जिल्हा दंडाधिकाऱ्यांना हा अधिकार देण्यात आला. या राज्यांमध्ये गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबचा समावेश होता.