India vs New Zealand : भारताने घेतला बदला; न्युझीलँडवर चार गडी राखून विजय

    123

    नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज भारताने (India) न्युझीलँडवर (New Zealand) चार गडी व १२ चेंडू राखून विजय मिळविला. २०१९च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्युझीलँडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला आज भारतीय संघाने घेतला. भारताच्या विजयानंतर मैदानात जोरदार आतषबाजी झाली.

    हा सामना धर्मशाळा येथे खेळविण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी न्युझीलँड संघाचे दोन्ही सलामीवीर झटपट बाद केले. मात्र, त्यानंतर रचिन रवींद्र (७५ धावा) व डॅरिल मिचेलने (१३० धावा) संघाचा डाव सावरत १५९ धावांची भागीदारी केली. रचिनला मोहम्मद शामीने बाद केले. त्यानंतर न्युझीलँडचे फलंदाज बाद होण्याचा क्रम सुरू झाला. मिचेलने शेवटच्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली. त्यामुळे न्युझीलँडच्या संघाने ५० षटकांत सर्वगडी गामवत २७३ धावा जमविल्या. भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक पाच फलंदाज बाद केले. कुलदीप यादवने दोन, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

    भारतीय संघाने सुरूवात चांगली केली. संघाच्या ७१ धावा झाल्या असताना कर्णधार रोहित शर्मा (४६ धावा) बाद झाला. मैदानात आलेल्या विराट कोहलीने शुभमन गिल (२६ धावा), श्रेयस अय्यर (३३ धावा), के.एल. राहुल (२७ धावा) यांना बरोबर घेत संघाला सन्मानजनक स्थितीत आणले. कोहलीने रवींद्र जडेजाला बरोबर घेत संघाचा विजय निश्चित केला. मात्र, विराट कोहलीचे शतक हुकले. तो ९५ धावा काढून बाद झाला. त्याचे हे शतक झाले असते तर त्याने सचिन तेंडूलकरच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली असती. रवींद्र जडेजा ३९ धावा करत नाबाद राहिला. विजयी चौकार जडेजानेच लगावला. न्युझीलँडकडून लॅकलान फर्ग्युसनने सर्वाधिक दोन फलंदाज बाद केले. भारतीय संघाने ४८ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या. 

    यंदाच्या विश्वचषकातील न्युझीलँडचा हा पहिला पराभव होता. भारताने एकही सामना गमावलेला नाही. या विजयामुळे भारतीय संघ अंकतालिकेत प्रथम स्थानी आला आहे तर न्युझीलँड दुसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्थानावर आहे. गत विश्वचषक विजेता इंग्लंड नवव्या स्थानावर आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here