
नगर : विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आज भारत (India) व बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने बांग्लादेशवर सात गडी व ५१ चेंडू राखून विजय मिळविला. विक्रमवीर विराट कोहली (Virat Kohali) (नाबाद १०३ धावा) सामनावीर ठरला.
बांग्लादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीविरांनी हा निर्णय सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. तानझीद हसनने ४३ चेंडूंत ५१ धावा व लिटॉन दास ८२ चेंडूंत ६६ धावा केल्या. ही जोडी कुलदीप यादवने तोडली. त्यानंतर बांग्लादेशचे फलंदाज क्रमाक्रमाने बाद होत गेले. मोहमुदुल्लाहने (४६ धावा) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. बांग्लादेशचा संपूर्ण संघ ५० षटकांत आठ गडी गमावत २५६ धावा करू शकला. गोलंदाजी करताना चेंडू लागून हार्दिक पांड्या जखमी झाला.
भारतीय सलामीविरांनीही भक्कम सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने ४८ तर शुभमन गिलने ५३ धावा केल्या. विराट कोहलीने नाबाद शतक करत भारताला विजय मिळवून दिला. बांग्लादेशकडून मेहेदी हसनने दोन फलंदाज बाद केले. भारताने ४१.३ षटकांत तीन गडी गमावत २६१ धावा केल्या.
क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकरनंतर सर्वाधिक शतके झळकावणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा रोहित शर्माच्या आहेत तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. सर्वात वेगवान २६ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आज लिहिला गेला. आजच्या विजयामुळे यंदाच्या विश्वचषकातील अंकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आला आहे. न्युझीलँड पहिल्या स्थानी आहे. या दोन्ही संघांत रविवारी (ता. २२) धर्मशाळा येथे सामना होईल.